मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उमेदवार आणि पक्षांचे स्टार प्रचारक रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, भाजपकडून बिहारच्या आमदार, प्रसिद्ध गायिका आणि स्टार प्रचारक मैथिली ठाकूर मुंबईत दाखल झाल्या आहेत. त्यांनी गायलेल्या मराठी गाण्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
मैथिली ठाकूर यांनी मुंबईतील दहिसर प्रभाग क्रमांक 1 मध्ये रोड शो केला. या रोड शोदरम्यान त्यांनी मराठीत गाणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या अनोख्या प्रचारशैलीचे सर्वत्र कौतुक होत असून, मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे केला आहे. “यूपी, बिहार आणि मराठी असे वेगळे वेगळे करण्यापेक्षा विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे,” असा संदेश त्यांनी आपल्या गाण्यातून आणि भाषणातून दिला.
प्रचारादरम्यान बोलताना मैथिली ठाकूर म्हणाल्या, “लोकांना एकत्र करून विकासाच्या मार्गावर वाटचाल करणे गरजेचे आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाण्याचा हाच संदेश घेऊन मी येथे आले आहे.” मराठी भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी खास शैलीत प्रतिक्रिया देत, “अरे भाऊ, तुम्ही असं काय बोलतात? मीही उत्तर भारतीय मराठी आहे,” असे सांगत टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाला झोपडपट्टी घोषित करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख करत मैथिली ठाकूर म्हणाल्या की,“यामुळे लोकांचा विकास होईल. मुंबई हे माझे दुसरे घर आहे. मी इथे येत राहीन, जात राहीन.” भाजप ही जागा मोठ्या फरकाने जिंकेल, लोकांना बदल हवा आहे आणि भाजपचा महापौर निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी गाण्याच्या सुरांतून दिलेला विकासाचा संदेश आणि उत्तर–दक्षिण भेद मिटवण्याचे आवाहन यामुळे मैथिली ठाकूर यांचा हा प्रचार रोड शो मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.