ध्यास विश्वसार्ह बातमीचा

करमाळ्यात इतिहास; भाऊ-बहिण-भावजयी एकाचवेळी विजयी!

सोलापूर प्रतिनिधी : राज्यातील नगर पालिका व नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून बहुतांश ठिकाणी महायुतीने दणदणीत यश मिळवत राज्यभर जल्लोषाचे वातावरण निर्माण केले आहे. 200 पेक्षा अधिक जागांवर महायुतीने विजय मिळवला असतानाच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगरपालिकेच्या निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. करमाळ्यात एकाच घरातील तीन उमेदवारांनी एकाचवेळी विजय मिळवल्याने या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

करमाळा नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भाऊ, बहीण आणि भावजयी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. लता घोलप, सचिन घोलप आणि निर्मला गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवत राजकीय वर्तुळात इतिहास घडवला आहे. या विजयानंतर तिघांनीही एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा एकाचवेळी विजय ही करमाळ्याच्या राजकारणातील दुर्मीळ घटना मानली जात आहे.

दरम्यान, करमाळ्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप तसेच भाजपच्या उमेदवार सुनीता देवी यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत करमाळा शहर विकास आघाडीने सरशी साधली असून नगराध्यक्ष पदावर मोहिनी संजय सावंत यांनी शानदार विजय मिळवला आहे. विजयानंतर शहरात जेसीबीमधून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिनी सावंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा केवळ माझा नाही तर करमाळा शहराच्या जनतेचा विजय आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनापासून आभार मानते. करमाळा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा मुख्य ध्यास असून, प्रत्येक मतदाराच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!