ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गड-किल्ल्यांचा इतिहास  समजून घेण्याची गरज 

विवेकानंद प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचा शुभारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा सोहळा नसून तो समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. या प्रबोधनपरंपरेला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान करत आहे, अशा शब्दांत इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी गौरवोद्गार काढले. गुरुवारी, अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेचे उद्घाटन त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने झाले.

 

या व्याख्यानात महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा इतिहास, त्यांचे महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांची भूमिका यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला. आज अनेक जण किल्ल्याला भेट देतात, फोटो काढतात आणि ‘मी किल्ला पाहिला’ असे सांगतात. पण किल्ला पाहणे म्हणजे फक्त भिंती, दरवाजे वा दगड पाहणे नाही. किल्ला हा आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे. त्यामागे पराक्रम, बलिदान, स्वप्न आणि स्वराज्य उभारणीची अद्वितीय कथा दडलेली आहे. म्हणून किल्ले वेगळ्या नजरेने, जाणिवेने पाहण्याची गरज आहे,असे ते म्हणाले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची पार्श्वभूमी उलगडताना खोत म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी असा काळ होता की कोणीही परकीय आक्रमकांविरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नव्हता. त्यावेळी निजामशाहीतील एका सरदाराचा मुलगा स्वराज्याचे स्वप्न पाहतो, सहकाऱ्यांना गोळा करतो आणि गनिमी काव्याच्या अद्भुत रणतंत्राने किल्ल्यांवर विजय मिळवतो. ही कथा आपल्याला आजही प्रेरणा देते.

 

 

किल्ल्यांची बांधणी चौथ्या शतकापासून होत असल्याचा उल्लेख करून त्यांनी विविध गडांचे प्रकार, त्यांचे सामरिक महत्त्व, तसेच गनिमी काव्याची वैशिष्ट्ये याबद्दलही माहिती दिली. इतिहास पुन्हा जिवंत करण्यासाठी गड-किल्ल्यांचा अभ्यास आणि संवर्धन आवश्यक आहे. अन्यथा आपण फक्त अवशेष बघत राहू आणि मूळ आत्मा हरवून बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

या व्याख्यानादरम्यान एलईडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून गड-किल्ल्यांचे छायाचित्र व ऐतिहासिक माहितीचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे रसिकांना विषयाचे दृष्य व बौद्धिक असे दुहेरी अनुभव मिळाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.यावेळी मुकुंद उत्पात,गुरुपादप्पा आळगी, राजशेखर उमराणीकर, सुनील गोरे, दत्ता कटारे, मोहन शिंदे, मल्लिकार्जुन मसुती, आकाश पटांगडे, हर्षवर्धन कुरे आदींची उपस्थिती होती. अशोक येणेगुरे यांनी वक्त्यांचा सत्कार केला, कल्पना स्वामी यांनी खोत यांचा परिचय करून दिला.तर बापूजी निंबाळकर यांनी  सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला अभिजित लोके, मोहन चव्हाण, खंडेराव घाटगे, प्रा.किशोर थोरे,चंद्रकांत दसले,महेश कलशेट्टी यांच्यासह रसिक नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!