ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईः राज्यात सध्या कोरोना संकट वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के आहे. वाढत्या कोरोना संकटामुळे सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्यातील ठाकरे सरकारने केले आहे.

सध्या राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी शब-ए-बारात अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. या संदर्भात महाराष्ट्राच्या गृह विभागाच्यावतीने निवडक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

★ शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपापल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी २८ मार्च २०२१ची रात्र आणि २९ मार्च २०२१ची पहाट या कालावधीत (चंद्रदर्शनावर अवलंबून) येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुवा पठण करावे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी.

★ शब-ए-बारात निमित्त स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरिता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी ४० ते ५० व्यक्तींनी टप्प्याटप्प्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन आणि मास्कचा वापर करून दुवा पठण करावे.

★ मशिदीतील व्यवस्थापक असणाऱ्यांनी मशिद व आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इ.) यांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.

★ शब-ए-बारात दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या वाझ या कार्यक्रमाचे आयोजन शक्यतो बंदीस्त जागेत करावे. जर खुल्या जागेत आयोजन केले तर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

★ कोरोना संकटामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे लागू असलेल्या फौजदारी दं.प्र.सं. कलम १४४ अन्वये जारी केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे.

★ शब-ए-बारातच्या अनुषंगाने वाझ कार्यक्रमाचे आयोजक यांनी कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून द्यावी.

★ कोविड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!