मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर गेल्या दोन दिवसापासून शिंदेंच्या सेनेतील नेत्यांनी टीकास्त्र सुरु असतांना आता पुन्हा एकदा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गभीर आरोप करीत नेत्या नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करत थेट मातोश्रीवरील रेटकार्ड बाहेर काढले आहे. मातोश्रीवर राबणाऱ्या कार्यकर्त्याच्या जागी गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिट दिले जात होते, असे ते म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांना एक-दोन मर्सिडीज भेट दिल्या की ते पद देतात, असा दावा विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. ते यासंबंधी म्हणाले की, आमच्याकडे मातोश्रीविषयी अनेक पुरावे आहेत. लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचे वेगवेगळे रेटकार्ड आहेत.
ठाकरे गटात पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जागी गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाते. यामुळे अनेकजण ठाकरेंना सोडून गेले. रामदास कदम, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत यांच्यासारख्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना कोणकोणत्या प्रकारचे गिफ्ट मागण्यात आले हे विचारले पाहिजे. कोण गिफ्ट देतो? कसे तिकीट मिळते? विधानसभेचे तिकीट हवे असेल तर त्याचे वेगळे रेटकार्ड आहे. या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी सांगितलेले तथ्य डावलता येणार नाही.
उद्धव ठाकरे यांची मागील 15 वर्षांपासून राजकारण करण्याची हीच पद्धत आहे. त्याला कंटाळूनच त्यांना अनेकजण सोडून गेले. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तिकीट देताना केवळ उमेदवार विजयी होणार की नाही? तो शिवसैनिक आहे की नाही? ही एकच गोष्ट पाहिली जाते, असे योगेश कदम म्हणाले.
भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर निश्चितच कारवाई होणार. तुम्हाला एवढा पाकिस्तानचा पुळका असेल तर खुशाल जा. भारतात असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असेही योगेश कदम यावेळी ठणकावत म्हणाले.