ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटकात भीषण अपघात; स्लीपर बसला आग, १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात स्लीपर बसला आग लागून १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा १२ ते १७ दरम्यान असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हिरियूर तालुक्यात रात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूरूहून गोकर्णकडे जाणारी खाजगी सीबर्ड ट्रान्सपोर्ट कंपनीची स्लीपर बस या मार्गावरून जात होती. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते. दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या एका लॉरीने रस्त्यावरील दुभाजक तोडत विरुद्ध बाजूने जाऊन बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसला तात्काळ आग लागली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते. अचानक लागलेल्या आगीत बस काही मिनिटांतच जळून खाक झाली. आग इतकी भीषण होती की अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीत अडकलेल्या १० हून अधिक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठे प्रयत्न करावे लागले. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृतांचा नेमका आकडा आणि अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. झोपेत असलेल्या प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने ही घटना अत्यंत हृदयद्रावक मानली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!