ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दिल्लीत तासभर चर्चा : चव्हाण, फडणवीसांच्या तक्रारी : महायुतीत शिंदे नाराज ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः रवींद्र चव्हाण हे मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून भाजपकडे वळवत असल्याची तक्रार शिंदेंनी केली असल्याचे सांगितले जाते. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असल्याचे आश्वासन अमित शहांनी शिंदेंना दिले.

शिंदे आणि अमित शहा यांच्यात सुमारे 50 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीत उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दलही शिंदेंनी नाराजी व्यक्त केली. “माझी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांना या समितीवर का घेतले?” असा सवाल त्यांनी केल्याचे समजते.

महायुतीत तणाव वाढवणाऱ्या काही नेत्यांमुळे कार्यकर्त्यांत गैरसमज निर्माण होत असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अडथळे येऊ शकतात, अशी चिंता शिंदेंनी व्यक्त केली. काही नेते वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत असल्यामुळे महायुतीची एकजूट बिघडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमित शहांची भेट झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी बोलताना कोणतीही नाराजी नसल्याचे सांगितले. “मी तक्रार करणारा नाही, रडणारा नव्हे तर लढणारा कार्यकर्ता आहे. महायुतीत मतभेद नाहीत. आमचे वाद आम्ही आतमध्ये सोडवतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!