नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासुंद देशासह राज्यात अनेक गुन्हेगारी घटना घडत असताना विरोधकांनी सरकारवर चांगलीच तोफ डागली असतांना नुकतेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पश्चिम बंगाल, यूपी, बिहारपाठोपाठ महाराष्ट्रातही मुलींवर होणारे लाजिरवाणे गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत?
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, बदलापूरमध्ये दोन निरपराधांवर झालेल्या गुन्ह्यानंतर जनता जोपर्यंत ‘न्यायासाठी याचना’ करत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल उचलले जात नाही. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? अखेर पीडितांना पोलिस ठाण्यात जाणेही अवघड का झाले आहे? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हे लपविण्याचे अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक ठरत आहेत. एफआयआर न नोंदवल्याने पीडितांची निराशा तर होतेच पण गुन्हेगारांना देखील धीरही मिळतो, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नसल्याचेही खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.