मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा जागावाटपासाठी महायुतीमध्ये सुरू झालेल्या चर्चेच्या पहिल्याच फेरीत जबरदस्त चुरस निर्माण झाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तब्बल १२६ जागांवर दावा केला असतानाच, भाजपही १६० ते १७० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, जागावाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुरुवारीच मुंबईत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत १६० ते १७० जागा लढवण्याचा विचार झाला. या दोन दाव्यांची बेरीज केली तर महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला जेमतेम ८-१० जागा उरतात. या गटानेही ८० ते ८५ जागा लढवण्याची भाषा आधीच सुरू केलेली आहे.
महायुतीचे दोन घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्या स्वतंत्र बैठका गुरुवारी मुंबईत झाल्या. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक गुरुवारी झाली. सुमारे चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत जागावाटपावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे १०३ आमदार असले तरी अपक्ष आणि छोट्या मित्र पक्षांना सोबत घ्यायचे असल्याने भाजपने १६० ते १६५ जागा लढवाव्यात, असा सूर या बैठकीत उमटला.
कोअर कमिटीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संजय कुटे, पंकजा मुंडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती होती.