छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अंतरवली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी साडेदहा वाजता मराठा समाजबांधवांचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला. मंगळवारपासूनच हजारोंच्या संख्येने समाजबांधव अंतरवलीत दाखल झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मोर्चाचा ताफा वडीगोद्री फाटा येथे पोहोचला असता, गाड्यांचा आणि पायी चालणाऱ्या समाजबांधवांचा प्रचंड लोंढा पाहायला मिळाला. सोलापूर-धुळे महामार्गाच्या डाव्या बाजूला दोन ते तीन किलोमीटरवर गाड्यांची अखंड रांग होती. अवघे दहा किलोमीटर अंतर पार करायला तब्बल तीन तास लागले. दुपारी दोनच्या सुमारास मोर्चा अंकुशनगर-कारखाना, शहागड येथे पोहोचला, याठिकाणी मनोज जरांगे यांचे कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. थोड्याच वेळात मोर्चा पैठण फाटा (खुटा चौक) येथे दाखल झाला, जिथे जनसागराने महामार्गाच्या दोन्ही बाजू भरून टाकल्या होत्या. गर्दी एवढी होती की, फक्त पैठण फाटा ओलांडायलाच अर्धा तास लागला.
पैठण फाट्यावर जरांगे यांच्या स्वागतासाठी उंच क्रेनवर भला मोठा पुष्पहार सजवण्यात आला होता. पावणेचारच्या सुमारास मोर्चा साष्ठे पिंपळगाव येथे दाखल झाला. येथे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत मोर्च्याचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण गावकरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोर्च्याला अभिवादन करण्यासाठी उभे होते. या वेळी मनोज जरांगे यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मोर्चा पुढे पैठणच्या दिशेने मार्गक्रमण करत असून, प्रत्येक टप्प्यावर गर्दी शेकडोंच्या संख्येने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोर्चात सहभागी होत जरांगे यांचा सत्कार केला.
हजारोंचा मोर्चात हजारोंचा जनसमुदाय एकच नारा देत होता, तो म्हणजे पाटील-पाटील. तसेच तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम आपके साथ हैं, आरक्षण देत कस नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन मराठा आरक्षण, आरक्षण घेऊनच मुंबईतून परतनार या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
मोर्चामध्ये डॉक्टर, वकील, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असे गरीब श्रीमंत समाजबांधव सर्व समावेशक सहभाग दिसून आला. यामध्ये पुरुष, महिला, युवक-युवती, लहान मुले आणि वृद्ध यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. अगदी लहान मुलेसुद्धा जरांगे यांच्या ताफ्यासमोर धावत चालत होती. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लढा दिला जात आहे, हे त्यांच्या डोळ्यांतून स्पष्ट जाणवत होते. मोर्चा दोन-तीन डीजें सोबत घेण्यात आले असून, समाजबांधवांनी आपल्या गाड्यांमध्येही साऊंड सिस्टम बसवली आहे. यावर छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाणी नॉनस्टॉप सुरू आहेत. त्यामुळे अंतरवली सराटीहून निघालेल्या मोर्चात समाजबांधव मोठ्या उत्साहात, न थांबता, न थकता नाचत मार्गक्रमण करत आहेत.
अंतरवली सराटीतून निघालेल्या महामोर्चावर, विशेषतः मनोज जरांगे यांच्यावर, समाजबांधव जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करत होते.
वडीगोद्री फाटा, अंकुश नगर कारखाना, पैठण चौक, साष्ट पिंपळगाव, नवगाव, आपेगाव, पैठण या गावांमध्ये रस्त्याच्या दोन्ही कडेला जेसीबी उभे करून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. यामध्ये विशेषतः पैठणमध्ये अनेक जेसीबीतून पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. वडीगोद्री फाट्यापासून अनेक गावांत समाजबांधवांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मसाला पुरी, मसालेभात, शिरा अशा पदार्थांचा समावेश होता. विशेषतः साष्ट पिंपळगाव या गावातून जास्त दिवस टिकेल अशी मसाला पुरी मोठ्या प्रमाणात समाजबांधवांना वाटप करण्यात आली.