मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्यानंतर आता मुंबईसह नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव या पाच शहरांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका राजूल पटेल आणि अनेक महत्त्वाच्या पदाधिका-यांचा समावेश आहे.
विधानसभेचे निकाल विरोधात गेल्यापासून ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. ठाकरे गटाला एकमागून एक धक्के बसत आहेत. आज मुंबईसह नाशिक, कोल्हापूर, सांगली आणि जळगाव या पाच शहरांमध्ये ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. या पाचही बड्या शहरांतील जुनेजाणते शिवसैनिक आणि असंख्य पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बळ वाढले आहे. तर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्क्यावर धक्के बसत असल्याने ठाकरे गटाची तारांबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्व. आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तिस्थळावर पक्ष प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.
मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि ठाकरे गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिका-यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.