ध्यास विश्वसार्ह बातमीचा

“मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही” : प्रफुल्ल पटेलांचा स्पष्ट शब्दांत खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. “अजित पवारांच्या निधनानंतर कोण, काय, कसे आणि कुठे—या सर्व प्रक्रिया नीट पार पाडण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, हे स्पष्ट आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयात आज स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल यांनी पक्षात कोणत्याही प्रकारचे विलीनीकरण होणार नसल्याचेही ठळकपणे अधोरेखित केले. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत सुरू असल्याची चर्चा असलेले कथित विलीनीकरण आता पुढे सरकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली. सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांसह आम्ही सुनेत्रा पवार यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. “राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या पाठिशी आहे,” ही भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली. पक्ष व जनतेचीही अपेक्षा लक्षात घेता सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली, असे त्यांनी सांगितले.

पक्षातील अंतर्गत चर्चांबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आम्ही एक पक्ष आहोत, मात्र त्याचे दोन भाग आहेत—विधीमंडळ पक्ष आणि राजकीय संघटना. विधीमंडळाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता संघटनात्मक निर्णयांवर चर्चा सुरू आहेत. मात्र बाहेरून, ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे लोक उलटसुलट चर्चा करून संभ्रम निर्माण करत आहेत.”

अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, “एका केंद्रीय मंत्र्याने चुकून माझा उल्लेख पक्षाध्यक्ष म्हणून केला होता. त्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केला. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा विधीमंडळ पक्षासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. महाराष्ट्रातील संघटनात्मक जबाबदारी सुनील तटकरे यांच्याकडे आहे.”

शेवटी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “पक्षाचा निर्णय योग्य दिशेने, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीचाच होईल—आणि तो माझ्याशिवायच असेल. मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही.” पत्रकारांनी याबाबत थेट प्रश्न विचारल्यानंतरही त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहून सकारात्मक उत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!