अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मला व आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची ऑफर होती,असा गौप्यस्फोट अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी बु येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केला आहे. शिंदे यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर सध्या सोलापुरातील राजकीय वातावरण तापले असताना शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे शिंदे हे सध्या मतदारसंघातील अनेक भागात दौरे करत आहेत.त्याच अनुषंगाने अनेक दिवसानंतर शिंदे हे अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी हुरडा पार्टीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे,जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे,मल्लिकार्जुन पाटील,चेतन नरोटे,शितल म्हेत्रे,प्रथमेश म्हेत्रे,अशपाक बळोरगी,रईस टिनवाला, सिद्धार्थ गायकवाड,सातलिंग शटगार, महेश जानकर,राजू लकाबशेट्टी,पंडित मुळे, अशोक ढंगापुरे,पिंटू पाटील,बाबासाहेब पाटील,मल्लिनाथ कल्याण,आनंदराव सोनकांबळे, काशिनाथ कुंभार यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती.यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांचा झालेला प्रवास आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे योगदान यावरही भाष्य केले.सध्या देशात लोकशाहीच्या दृष्टीने वातावरण गढूळ झाले आहे प्रत्येक निर्णयात हुकमशाही चालू आहे असे सांगतानाच दबाव तंत्र वापरून काही जणांना प्रलोभने दाखवून आपल्या पक्षामध्ये खेचण्याचे काम विरोधी पक्षाकडून सुरू आहे
मला आणि प्रणितीला देखील मधल्या काळात भाजपमध्ये या असे म्हणत होते,असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.ही गोष्ट कदापि शक्य होणार नाही मुळात मी कोर्टामध्ये चपराशी होतो हे संपूर्ण देशाला माहिती आहे एक चपराशी माणूस संसदेचा नेता बनला.ही गोष्ट माझ्यासाठी कमी नाही.माझ्या रक्तात काँग्रेस आहे.माझे बालपण, तरुण पण हे पूर्णपणे काँग्रेसमध्ये गेलेले आहे हे कसे शक्य आहे असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला.काँग्रेस सर्वधर्म जपणारा पक्ष आहे या पक्षामध्ये अनेकांनी त्याग केलेला आहे सध्या हा पक्ष जरी संकटात असला तरीही काही जणांनी पक्ष सोडलेला नाही.आज माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. उजनीच्या पाण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.आज शंकर म्हेत्रे यांच्यामुळे युवा पिढी काँग्रेसच्या पाठीमागे उभी आहे भविष्यातसुद्धा काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत याचा मला विश्वास आहे.दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मी कधीच नाराज झालो नाही असा पक्ष सोडण्याचा विचार कधी केला नाही आणि तसा विचार करणाऱ्यापैकी मी नाही.कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहीन, असेही शिंदे यावेळी म्हणाले.