तुळजापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील गाभारा पाडण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र, काहीही झाले तरी आम्ही देवीचा गाभारा पाडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी मंगळवारी तुळजापूर मंदिरात भेट देत देवीचे दर्शन घेतले. तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या गाभारा दुरुस्ती व विकासकामांची पाहणी केली. या पाहणीनंतर सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा आरोप केला आहे.
राज्य सरकारकडून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मंदिरातील गाभारा दुरुस्ती व विकासकामांची पाहणी केली. इतर विकासकामाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, “गाभाऱ्याला काहीही गरज नसताना त्याची मोडतोड का केली जाते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “मी सनातन हिंदू नसलो, तरी हिंदू आहे आणि देवीच्या मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही,” असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट
तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे.हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे. याविरोधात आज तुळजापूर येथे मंदिराला भेट देऊन भाविकांच्या याबाबत जनजागृती केली….सोबतच आई तुळजाभवानी मातेचे दर्शन देखील घेतले..!
जितेंद्र आव्हाड मंदिरात दाखल झाल्यानंतर राजे शहाजी महाद्वारातून त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मात्र, त्यानंतर मंदिरात प्रवेश करताना त्यांच्या कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक यांच्यात गोंधळ उडाला. आव्हाड यांना मंदिरात सोडल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही आत प्रवेश मिळावा अशी मागणी करत गर्दी केली. त्यामुळे सुरक्षारक्षक व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याच दरम्यान दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांची लाईन काही काळ थांबवण्यात आली, त्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड तुळजापूर मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. “आव्हाड यांनी हिंदू भावनांचा अपमान केला आहे, त्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा आंदोलन मागे घेणार नाही,” अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यांनी आई तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावरून केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला.