ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना अधिक बळकट करू !

मुंबई : वृत्तसंस्था

सध्याच्या सरकारने योजनांबाबत अभ्यास न करता काम केले असून, राज्यात आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसह सर्व योजना अधिक बळकट करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर अध्यक्षस्थानी होत्या.

स्वागत शिवप्रसाद तेली यांनी केले. यावेळी कुपेकर फाऊंडेशनच्या वतीने गरजू 250 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, सुनील गवाणे, व्ही. बी. पाटील, बाळासाहेब कुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. नंदा बाभूळकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य यापूर्वी होते व यापुढेही राहणार असून, राज्यातील महिला सुरक्षित ठेवण्यात विद्यमान सरकार अपयशी ठरले आहे. चंदगडमधील गद्दारीचा नेसरीच्या खिंडीत अंत करूया, असे स्पष्ट केले.
आ. जयंत पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी कुपेकरांनी मतदारसंघातून थांबायचे ठरवल्यामुळे ज्यांना उमेदवारी दिली व निवडून आणले त्यांनी मतदार व पक्षाशी गद्दारी केली. विकासकामांचा निधी किती आणला, याची आकडेवारी दिल्यावर लोक त्याला 20 टक्क्याने हिशेब काढतात. गद्दारी करून गेलेल्यांवर लोकांचा विश्वास नसून, सध्याच्या सरकारने 9 लाख कोटी कर्ज केले आहे. लोकसभेनंतर परिस्थिती पाहून सरकारने तिजोरी खाली करण्याचा सपाटा लावला असून, आम्ही मात्र आमच्या कार्यकालात बळकट योजना अस्तित्वात आणू.

खा. अमोल कोल्हे म्हणाले, गुलाबी जॅकेटवाल्यांना चिन्ह चोरून मते मिळवता येतील असे वाटते; मात्र महाराष्ट्र स्वाभिमानी असून, तो कधीच झुकणार नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना चंदगडची जनता नक्कीच जागा दाखवेल. घड्याळ आज जरी तुमचे असले तरी येणारी वेळ ही मतदारांची असेल. यावेळी शरदचंद्र पवार गटाचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!