पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात व शहरात रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस आढळून येत आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर वाघ, बिबट्या अनेकदा दिसतात. मात्र, आता या वन्य प्राण्यांचा वावर शहरातदेखील वाढताना दिसत आहे. पुण्यातील लोहेगावमध्ये तरस दिसला आहे.
पुण्यातील प्राईड वर्ल्ड सिटीजवळ लोहेगाव येथील एका रस्त्यावर तरस आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अचानक रस्त्यावर तरस दिसल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिनाशांना पहाटे किंवा रात्री न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यातील रस्त्यावर फिरणाऱ्या या तरसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत रात्री एक तरस रस्त्यावरुन फिरताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेने तरस जाताना दिसत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूनेच तरस जात असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या एका बाजूला तरस तर दुसऱ्याचा बाजूला माणसे प्रवास करताना दिसत आहे. परिसरातील लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत वर्ल्ड सिटीच्या सोसायटीने सूचना शेअर केली आहे. त्यामध्ये सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की, प्राईड वर्ल्ड सिटीपासून डी. वाय. पाटील कॉलेजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरुन तरस जात असल्याचे दिसले आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत तरसचा शोध लागला नाही.