बीड : वृत्तसंस्था
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये शांतता रॅलीचे आयोजन करणार आहे. मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 13 तारखेचा अल्टीमेटम सरकारला दिला आहे. मात्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाही. आज आम्ही शांततेच्या मार्गाने रॅली काढतोय, पुढची दिशा काय असणार आहे ? हे आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून ऐकायचं आहे, असे मराठा समन्वयकांनी सांगितलं.
‘जसा फटका लोकसभेत सरकारला झाला, तो फटका जर पुन्हा बसू नाही, असं वाटत असेल तर सरकारने तात्काळ सग- सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा येणाऱ्या विधानसभेत मराठ्यांची ताकद दाखवू, असा इशाराही बीडमधून मराठा समन्वयकांनी दिला आहे.
दरम्यान, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीची आणि सभेची परवानगी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या रॅलीसाठी परवानगी पोलीस प्रशासनाला मागितल्या, त्या परवानगी आम्हाला दिल्या आहेत. त्यामुळे परवानगी घेऊनच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे, अशी देखील माहिती मराठा समन्वयकांनी बोलताना दिली आहे. त्यामुळे या शांतता रॅलीत मनोज जरांगे पाटील काय बोलणार, कोणावर टीका करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढलं आहे. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.