ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हे केंद्र उभं केलं की आम्ही ते फोडून टाकू ; राज ठाकरेंचा थेट इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वीच सर्वच नेत्यांनी एकमेकावर आगपागड करण्यास सुरुवात केली आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेचा प्रत्यय दिला. पक्षाच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांनी दोन मोठ्या विषयांवर हल्लाबोल केला. यातील पहिला, ईव्हीएमद्वारे होत असल्याल्या मतदार फसवणुकीचा घोटाळा आणि दुसरा, राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणारे नमो टुरिझम सेंटर प्रकल्प. दोन्ही विषयांवर बोलताना राज ठाकरे यांनी सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शिवरायांच्या गडांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा विचारही निंदनीय आहे. हे केंद्र उभं केलं की आम्ही ते फोडून टाकू, असा थेट इशारा त्यांनी दिला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ईव्हीएम घोटाळ्याच्या चर्चेने केली. देशात आणि राज्यात सत्ता कशी येते हे आता सर्वांना समजलं पाहिजे. ही सत्ता मतांमधून नाही, तर मशीनमधून येते, असं म्हणत त्यांनी ईव्हीएमद्वारे मतांची फेरफार कशी होते, याचं प्रात्यक्षिकही मंचावर दाखवलं. राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं, जर मतमोजणी यंत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर पारदर्शकता हवी. निवडणूक आयोगाने एकही शंका राहणार नाही, अशी प्रणाली आणली पाहिजे. पण तसं होत नाही. कारण सत्ताधाऱ्यांना या अंधारातच फायदा मिळतो.

त्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. आणि तुम्ही तिथे नमो टुरिझम सेंटर उभारणार? हा विचारच लाजिरवाणा आहे. एकनाथ शिंदे यांना सत्तेचा इतका मोह झाला आहे की त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे. सत्ता मिळावी म्हणून जेवढं चाटूगिरीचं पातक करायचं, तेवढं ते करत आहेत, असा आरोप करत त्यांनी शिंदेंवर थेट हल्ला चढवला.

राज ठाकरे म्हणाले की, हे नमो टुरिझम सेंटर्स शिवनेरी, रायगड, राजगड, जिथे शिवरायांचा प्रत्येक दगड इतिहास सांगतो, तिथे उभे करायचे? ही फक्त नावाची केंद्रं नाहीत, तर मराठी अस्मितेवर घाला आहे. मी आता सांगतोय, सत्ता असो वा नसो, अशी केंद्रं उभी राहिली तर मनसे कार्यकर्ते त्यांना फोडून टाकतील. कारण गडावर फक्त छत्रपतींचं नाव चालेल, इतर कुणाचं नाही. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकच जल्लोष झाला.

याच संदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनादेखील कदाचित खाली काय चाललंय याची कल्पना नसेल. पण राज्य सरकारने खुशामतखोरीचं पातक गाठलं आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी, सत्ता वाचवण्यासाठी हे लोक काहीही करतील. अदाणीला जागा हवी, देऊन टाका! पर्यटन केंद्राचं नाव हवं ठेवा. पण गडकिल्ल्यांवर हे सगळं करणं म्हणजे मराठी स्वाभिमानाला चपलांनी तुडवणं आहे. त्यांनी उपस्थित प्रेक्षकांकडून जय महाराष्ट्रच्या घोषणा देऊन सभागृहात वातावरण तापवलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!