अमरावती, 2 डिसेंबर (हिं.स.)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि राज्याच्या नव्या सरकारचा गुरुवार ५ डिसेंबरला आझाद मैदानावर दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी मुंबईला रवाना होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘झूम’ बैठकीच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सविस्तर माहिती सर्वांना दिली होती. या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर ज्यांच्याकडे ‘पास’ असणे आवश्यक आहे, त्याबाबत पूर्व माहिती देऊन आता ज्यांच्या नावाने पास बनवला जाईल तेच भाजपचे पदाधिकारी या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. कार्यक्रम मात्र आपले नाव पुढे येईल की नाही, याची प्रतीक्षा असतानाच सर्वांनी तयारी सुरू केली आहे.
अमरावती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणी आणि महिला-पुरुष पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, शहर कार्यकारिणीअंतर्गत ३० ते ४० स्त्री- पुरुष प्रमुख पदाधिकाऱ्यांची टीम मुंबईला रवाना होणार आहे. यामध्ये शहराध्यक्ष प्रवीण पोटे पाटील, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, चेतन पवार, प्रा. दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर यांच्याशिवाय महिलांमध्ये सुरेखा लुंगारे, संध्या टिकले, श्रद्धा गेहलोत, लविना हर्षे, रिटा मोकळकर, शीतल वाघमारे, बरखा बोच्चे आदींचा समावेश असणार आहे.
या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण भागातील पदाधिकारीही सहभागी होत आहेत. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सुलभा खोडके, रवी राणा, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, केवलराम काळे, उमेश यावलकर, राजेश वानखडे, जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्षा अनिता तिखिले यांच्यासह अनेक अधिकारी ५ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमासाठी ४ डिसेंबरलाच सायंकाळी मुंबईकडे रवाना होतील.
५०० पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईतच
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आधीच मुंबईत ठाण मांडून आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळण्यासाठी 500 हून अधिक अधिकारी आधीच मुंबईत पोहोचले आहेत. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘पास’ नसेल तर ‘नो एन्ट्री’
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, ज्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे यादीत असतील त्यांनाच कार्यक्रमस्थळी तयार केलेल्या पासच्या आधारे प्रवेश दिला जाईल. पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे त्या यादीत आपलं नाव यावं यासाठी प्रत्येक जणांची स्पर्धा लागली आहे. सोमवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा सर्व पदाधिकारी, कार्यकत्यांना पासेस उपलब्ध करून दिल्या जातील.