देशातील प्रत्येक राज्यात आहार थोड्या फार प्रमाणात बदल असतो पण भारतीय आहारात कोथिंबिरीचा आणि धण्याचा उपयोग अनेक वर्षांपासून होत असल्याचं दिसून येतं. कोथिंबीर आणि धणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात; त्यामुळं ते आहारात नानाविध पद्धतीनं समाविष्ट केले जातात.
कोथिंबिरीमध्ये प्रोटिन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, केरोटीन, थियामीन, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वं आढळून येतात. कोथिंबीर पचनक्रिया सुरळीत ठेवते, पोटाच्या समस्या दूर करते, पचनशक्ती वाढवते. अपचन, मळमळ अशा अनेक समस्यांपासून आराम देण्यास मदतकारक ठरते.
अपचनामुळं पोटात होणार्या वेदना कमी करते. कोथिंबिरीच्या नियमित सेवनानं आम्लपित्त, अन्नावरची वासना कमी होणं, पोटात गुब्बारा धरणं, अल्सर, मूळव्याध आदी विकार दूर ठेवता येतात. शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर टाकण्यासही कोथिंबीर मदत करते, तसेच शरीरातलं वाईट कोलेस्ट्रेरॉलचं वाढलेलं प्रमाण कमी होण्यासाठी तिचा उपयोग होतो. डोळ्यांची आग होणं, डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होणं, डोळे कोरडे होणं किंवा क्षीण होणं अशा विकारांवर कोथिंबीर उपयोगी मानली जाते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, शरीराचा थकवा घालवून उत्साह वाढवण्यासाठी साहाय्यभूत ठरणार्या अन्नघटकात कोथिंबिरीचा आवर्जून समावेश केला जातो.
खासकरून अन्नपचन नीट न झाल्यानं जर जुलाब होत असतील, आम्लपित्तामुळं घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल, घशाशी येत असेल, मूत्रप्रवृत्ती होत नसेल व लघवीला आग होत असेल तर धण्याचं पाणी तसंच धणेपूड घालून केलेला काढा गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धण्याचा उपयोग अनेक मंडळी करताना दिसतात.