मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासाचा प्रश्न गंभीर बनत असताना, परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच संपूर्ण राज्यभर विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष ‘विद्यार्थी हेल्पलाईन’ सुरू करण्यात येणार असून शाळेत जाण्या–येण्याच्या प्रवासात उद्भवणाऱ्या अडचणींवर तात्काळ मदत मिळणार आहे.
धाराशिव बसस्थानकातील भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बस वेळेवर न सुटणे, अचानक रद्द होणे, थांब्यावर थांबत न जाणे अशा तक्रारी मंत्र्यांसमोर मांडल्या. या सर्वांवर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन सरनाईक यांनी दिले.
राज्यातील अनेक दुर्गम व आदिवासीबहुल भागांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी मानव विकास बसेस देण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकाणी या बसेसचा वापर इतर प्रवाशांसाठी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने, अशा बस केवळ शालेय वापरासाठीच ठेवण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, बस रद्द किंवा उशिराने येण्यामुळे त्यांचे तास बुडतात, शाळेत उशीरा पोहोचते, तर संध्याकाळी घरी जायला विलंब होतो. अनेकदा पालकांच्या तक्रारी, राग आणि भीतीला त्यांना सामोरे जावे लागते. काही अत्यंत गंभीर घटनांमध्ये विद्यार्थिनींनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा विषय शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे.