मद्रास : कर्नाटकातील हिजाब वादावर मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. देशात काही शक्ती धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. कोणी हिजाबसाठी, कोणी टोपीसाठी, तर कोणी आणखी काही गोष्टींसाठी लढत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे. सर्वश्रेष्ठ काय आहे, देश की धर्म? एकदंरीत देशाच्या फाळणीचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत नोंदवत न्यायालयाने धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली.
राज्यातील मंदिरांमध्ये हिंदूवगळता इतर धर्मीयांना प्रवेश करण्यास मनाई करावी तसेच इतर धर्मी यांना मंदिरांच्या परिसरात व्यवसाय करण्यावर बंदी घालावी, अशी विनंती जनहित याचिकेतून केली आहे. यावर सुनावणी करताना खंडपीठाने हिजाबच्या वादावर टिप्पणी केली.
मद्रास उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एम. एन. भंडारी आणि न्यायमूर्ती डी. भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने गुरुवारी कर्नाटकातील हिजाब वादाच्या अनुषंगाने गंभीर मते नोंदवली. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम येथील रंगराजन नरसिंहन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.