नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून भारतातील साखरेच्या किंमतीत ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खराब हवामान आणि साखर निर्यातीमुळे साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे साखरेच्या किंमतीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. साखर हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग असल्याने येणाऱ्या काही महिन्यात साखर महागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
व्यापार आकडेवारीनुसार, एस -30 ग्रेडच्या साखरेसाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या किंमती १७ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्विंटल प्रति ३ हजार ७९० रुपये आहेत. ही किंमत एका महिन्यापूर्वी प्रतिक्विंटल ३ हजार ५६५ रुपये आणि दोन महिन्यांपूर्वी प्रतिक्विंटल ३ हजार ३८० रुपये होती. मागील वर्षाच्या तुलनेत साखरेच्या किंमती ६.३ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि गेल्या दोन महिन्यांत १२ टक्क्यांनी साखरेच्या किंमतीत वाढ झाली आहे.
उद्योगाच्या अंदाजानुसार असे दिसून आले आहे की, १५ फेब्रुवारीपर्यंत भारताचे साखर उत्पादन दरवर्षी पेक्षा 12 टक्क्यांनी घटले आहे. प्रतिकूल हवामान आणि दोन वर्षानंतर साखर निर्यात पुन्हा सुरू झाल्याने साखर उत्पादनात कमतरता निर्माण झाली आहे. तसेच साखरेच्या उत्पादनात घट झाल्यामुळे साखर पुरवठा कमतरता निर्माण झाली आणि साखरेच्या किंमती वाढवल्या. कमी ऊस उपलब्धता आणि साखर कारखाने लवकर बंद झाल्यामुळे साखरेच्या किंमतीवर परिणाम झाला होता.
देशातील साखर कारखाने साधारणत: ऑक्टोबर ते मे अथवा जूनपर्यंत म्हणजे ४ ते ६ महिने सुरू असतात. यावर्षी उसाच्या तुटवड्यामुले यापूर्वीच बहुतांश साखर कारखाने बंद झाले आहेत. गेल्यावर्षी ५०५ साखर कारखान्याच्या तुलनेत यंदा केवळ ४५४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू सुरू केले. १ फेब्रुवारीपर्यंत उसाअभावी ७७ साखर कारखाने बंद झालेत तर मागील वर्षी केवळ २८ साखर कारखाने बंद झाले होते. याच काळात गेल्यावर्षी ४७७ कारखाने सुरू होत, तर सध्या ३७७ साखर कारखान्यांचा गाळीत हंगाम अद्याप सुरू आहे.