नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजस्थानमध्ये आमदार होण्यापूर्वीच मंत्री बनण्याचा बहुमान मिळालेले सुरेंद्र पाल सिंग टीटी यांच्यावर करणपुर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे सत्तारूढ भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार व राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) सुरेंद्र पाल यांना काँग्रेसचे रुपिंदर सिंह कुन्नर यांनी ११ हजार २६१ मतांनी पराभवाची धूळ चारली. या निकालाबरोबरच विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ ७० झाले असून सत्तारूढ भाजपकडे ११५ जागा आहेत.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्ता पादाक्रांत केली. त्यानंतर, भजनलाल हे १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पुढे ३० डिसेंबर २०२३ म्हणजेच सुमारे १० दिवस अगोदर भाजपने अगोदर भाजपने सुरेंद्र पाल सिंग टीटी यांना अनपेक्षितपणे राजस्थान सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. भाजपच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्याकडे कृषी विपणन, इंदिरा गांधी कालवा विभाग तथा अल्पसंख्याक व वक्फ विभागाची जबाबदारी देण्यात आली. भाजपने नंतर गंगानगर जिल्ह्यातील करणपूर पोट निवडणुकीत सुरेंद्र पाल यांना उमेदवारी दिली. त्यांना मंत्री बनवल्यामुळे आपसूकच विजय निश्चित असल्याची खात्री भाजपला होती. मंत्री बनल्यामुळे सुरेंद्र पाल यांनाही विजयाचा विश्वास होता. भाजपने आपल्या माध्यमातून शीख समाजाचा सन्मान केल्याचे त्यांनी प्रचारावेळी सांगितले. भाजपने सर्व ३६ समाजांना सोबत घेतल्याची भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखवली.
पण, भाजपची चाल जनतेने ओळखली व या निवडणुकीत जनतेने काँग्रेसचे उमेदवार रुपिंदर सिंह कुनर यांना कौल दिला. करणपुरमध्ये त्यामुळे भाजपची रणनीती सपशेल अपयशी ठरली आहे. विशेष बाब अशी की, राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार गुरमीत सिंह कुनर यांचे निधन झाले. त्यामुळे करणरपूरमधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. या ठिकाणी पोटनिवडणूक घेतली असता काँग्रेसने कुनर यांचे पुत्र रुपिंदर सिंग यांना मैदानात उतरवले. भावनिक लाटेमुळे जनतेने आपले मत काँग्रेसच्या पारड्यात जमा केले.