ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या बटालियनवर अतिरेक्यांनी केला बेछुट गोळीबार

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या ९ व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले असून १२ पोलीस जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

श्रीनगरच्या पंथचौक परिसरात पोलिसांच्या बसवर अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, पोलिसांचं उलट प्रत्युत्तर सुरू होताच अतिरेक्यांनी या परिसरातून पलायन केलं. या हल्ल्यात ३ पोलीस शहीद झाले असून १२ पोलीस जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.

हल्ल्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने अतिरेक्यांनी पलायन केलं. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केली आहे. अतिरेकी पंथचौक परिसरातच लपून बसलेले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

दरम्यान, श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात आज सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं. रंगरेथमध्ये अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्याची टीप सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने या परिसरात जोरदार सर्च ऑपरेशन केलं.

त्यामुळे चोहोबाजूने घेरले जात असल्याचं लक्षात आल्यानंतर अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!