नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात नव्या वर्षाचे जंगी स्वागत होत असतांना 1 जानेवारी रोजी अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात एका व्यक्तीने नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चढवला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक जखमी झाले.
भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता ही घटना घडली. यावेळी न्यू ऑर्लिन्समध्ये रात्रीचे 3:15 वाजले होते. शहरातील सर्वात गजबजलेल्या बोर्बन स्ट्रीटवर हजारो लोक आनंदोत्सव साजरा करत होते. अचानक एक वाहन गर्दीला चिरडत पुढे सरकले.
यानंतर हल्लेखोर पिकअप ट्रकमधून बाहेर आला आणि त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, त्यात हल्लेखोर ठार झाला. या चकमकीत दोन पोलीसही जखमी झाले आहेत. शमसुद्दीन जब्बार (42) असे हल्लेखोराचे नाव आहे. जब्बार हा टेक्सास राज्याचा रहिवासी असून त्याने अनेक वर्षे अमेरिकन सैन्यात सेवा बजावल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.
एबीसी न्यूजने पोलिस प्रवक्त्याचा हवाला देत म्हटले की, हा हल्ला मुद्दाम करण्यात आला होता. या घटनेनंतर नववर्षाच्या जल्लोषाचे वातावरण शोकाकुल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत जखमींना शहरातील 5 रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप ट्रकमधून इस्लामिक स्टेटचा ध्वज, शस्त्रे आणि आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) जप्त करण्यात आले आहेत.