नवी दिल्ली : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांवर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असल्याने राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. तर काँग्रेसतर्फे देखील बैठकांचे सत्र सुरू झाले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सोबतच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील नेते जागा वाटपात सर्वाधिक जागांवर दावा करत आहेत. या संदर्भात देखील राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर देखील राहुल गांधी यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप वाटतात जास्तीत जास्त जागा या आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्या दृष्टीने राहुल गांधी यांच्या दौऱ्यात महाविकास आघाडीची देखील एकत्रीत बैठक होणार का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.