अक्कलकोट : वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने महाराष्ट्रात हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून हातमाग व्यवसायाला बळकटी देण्याचे काम सरकार करीत आहे. या प्रशिक्षणातुन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन उपसंचालक संदिपकुमार यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी, सलगर व तोळणुर येथील वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार व विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने समर्थ योजनेअंतर्गत ४५ दिवशीय प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मैंदर्गीचे किरण केसुर होते.
या वेळी विणकर सेवा केंद्र अधिक्षक श्रीनिवास चन्ना, मोहनकुमार, सिध्देश जाधव, राजकुमार मुसुती, नगरसेवक, हणमंत आलुरे, मलकारप्पा मड्डे, सोमेश्वर म्हेत्रे, पार्वतीबाई नागठाण, सुनंदा आष्टगी, पूजा पुरंत, मुत्तणा बिराजदार, संगमेश्वर ढवणे, सिध्दाराम निंबाळे, नागप्पा आष्टगी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी श्री देवरदासमय्या महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन संदिपकुमार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा मानाचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना संदिपकुमार म्हणाले, देशाच्या ग्रामीण भागात ज्या गावात हातमाग विणकर मोठ्या प्रमाणात आहेत परंतु हातमाग व्यवसाय लोप पावत आहे. अशा ठिकाणी वस्त्र मंत्रालय व विणकर सेवा केंद्र यांच्या कडून प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कुंटुंबियाना रोजगार मिळाला आहे. बेटशिट, टावेल, आसनपट्टी, विविध प्रकारांचे साड्या, शर्टाचे कपडे विणुन व्यवसाय करीत असल्याचे स्पष्ट केले.
प्रारंभी नागप्पा आष्टगी यांनी अक्कलकोट तालुक्यातील हातमाग विणकरांचे व्यथा व प्रशिक्षण का गरजेचे आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी राजकुमार मसुती, सुनंदा आष्टगी यांची भाषणे झाली. सिध्दाराम निबांळ यांनी सुत्रसंचालन व स्वागत केले.