तीळ हे पोषक घटकांनी समृद्ध असून चवीलाही उत्तम असतात. कॅल्शियम, लोह आणि ओमेगा–३ फॅटी अॅसिडसारखी आवश्यक पोषक तत्त्वे तीळामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ही तत्त्वे हाडे मजबूत ठेवण्यास, सांधे निरोगी राखण्यास तसेच त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्रानुसार हिवाळ्यात तीळ खाणे विशेष फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांत शरीर निरोगी, मजबूत आणि उत्साही ठेवायचे असेल, तर तीळापासून तयार केलेल्या या पाच खास पाककृती आहारात आवर्जून समाविष्ट कराव्यात.
हिवाळ्यासाठी सर्वाधिक लोकप्रिय असलेले तीळ-गुळाचे लाडू हे उष्णता देणारे आणि पौष्टिक मानले जातात. हलके भाजलेले तीळ गूळ आणि वेलची पावडरमध्ये मिसळून लाडू तयार करता येतात. चव आणि गुणधर्म वाढवण्यासाठी त्यात किसलेले नारळ किंवा सुके आले घालता येते. हे लाडू सांधेदुखी कमी करण्यास, शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास आणि सर्दीपासून संरक्षण देण्यास मदत करतात.
तीळ आणि अळशीच्या बिया समान प्रमाणात भाजून त्यात काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून घेतल्यास पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर एक चमचा हे मिश्रण घेतल्याने शरीरातील कॅल्शियमचे शोषण योग्य प्रकारे होते.
दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असणाऱ्यांसाठी तीळाचे दूध हा उत्तम पर्याय आहे. तीळ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्यात खजूर घालून गाळून घेतल्यावर कोमट करून प्यायल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे सहज मिळतात.
हलके भाजलेले तीळ लसूण, हिरवी मिरची आणि आले घालून वाटून तयार केलेली चटणी रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यावर थोडे कच्चे मोहरीचे तेल घातल्यास चव आणि गुणधर्म दोन्ही वाढतात.
शेंगदाणे, तीळ आणि गूळ एकत्र करून तयार केलेली चिकी हिवाळ्यात विशेष उपयुक्त ठरते. कोमट पाण्यासोबत घेतल्यास फुफ्फुसांचे पोषण होते आणि खोकला-सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते. हिवाळ्यात तीळाच्या या पौष्टिक पाककृती आहारात घेतल्यास आरोग्य मजबूत राहते, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.