कुरनूर धरणाचा विसर्ग वाढविल्याने बोरी नदीकाठी पूरसदृश्य स्थिती; सहा दरवाजे उघडले, ३ हजार क्यूसेकचा विसर्ग
अक्कलकोट, दि.२८ : हस्त नक्षत्राच्या पावसाने तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सध्या हाहाकार माजवला आहे. दि.२६ सप्टेंबर ते दि. २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये बोरी मध्यम प्रकल्प कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होवून पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाचे सहा दरवाजे उघडल्यामुळे अनेक गावांत पाणी शिरले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
मागच्या दोन दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातील हरणा व बोरी या नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जलदगतीने वाढ झाली आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी बोरी मध्यम प्रकल्प, कुरनूर या धरणातून नियंत्रीत पाण्याचा विसर्ग सोडणेत येत आहे. या अंतर्गत दि.२८ सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजल्यापासून सायंकाळी ७ पर्यंत ३ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे धरणाखालील बोरी नदीच्या पाणी प्रवाहामध्ये वाढ होवून पूरप्रवण क्षेत्रातील गावांचा संपर्क तुटला आहे.
या पार्श्वभूमीवर बोरी नदी पूरप्रवण क्षेत्रातील काळेगाव, सांगवी बुद्रूक, आंदेवाडी (ज), चिंचोळी मै. या गावांना सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, उपविभागीय अधिकारी, सुप्रिया डांगे, तहसिलदार बाळासाहेब सिरसट आदी अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. या भेटीअंतर्गत संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या असून सर्व शासकिय विभागांना देखील आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने करण्यास सांगितले आहे. काळेगाव येथील नागरिकांना अत्यावश्यक वस्तु व वैद्यकिय सेवेची आवश्यकता भासल्यास तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चिंचोळी मै. येथील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी दुधनीच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. आंदेवाडी ज. येथील नागरिकांना आवश्यकता भासल्यास वैद्यकिय सेवा पुरविण्याकामी आरोग्य विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्यासंदर्भात तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, तहसिल कार्यालय अक्कलकोट येथील दूरध्वनी क्रमांक ०२१८१,२२०७३३ या क्रमांकावर काळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.