अक्कलकोटला रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढल्यास विकासाला आणखी चालना
स्टेशन रस्त्याच्या चौपदरीकरणासह लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळण्याची गरज
अक्कलकोट : मारुती बावडे
तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीमुळे जगाच्या नकाशावर येत आहे.त्या दृष्टीने भाविकांना सुविधा मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे.मागच्या दहा वर्षापासूनचा इतिहास जर बघितला तर हळूहळू अक्कलकोटचा विकास होऊ लागलेला आहे असे म्हणायला हरकत नाही पण जोपर्यंत अक्कलकोटची कनेक्टिव्हिटी प्रभावी रित्या वाढणार नाही. तोपर्यंत अक्कलकोटची आर्थिक उलाढाल किंवा बाहेरून येणारी गुंतवणूक वाढणार नाही. त्यासाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी ही फार महत्त्वाची आहे.त्या दृष्टीने स्टेशनला जोडणारा रस्ता चौपदरी करण्याबरोबरच महत्त्वाच्या रेल्वे गाड्या अक्कलकोट स्टेशनला थांबवणे आणि स्टेशन मोठे करणे देखील फार गरजेची बाब बनली आहे.
याकडे अद्याप पर्यंत दुर्लक्ष झाल्याने लांबून येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली आहे.त्या दृष्टीने आता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोटला चौहूबाजूने रस्ते जोडले जात असताना आता शहर ते अक्कलकोट रेल्वे स्टेशन हा रस्ता चौपदरीकरणाची मागणी होऊ लागली आहे.हा रस्ता चौपदरीकरण झाल्यास या भागातील वाहतुक व उद्योगधंद्याला चालना मिळून हा परिसराचा विकास होणार आहे.या रस्त्यावर सध्या वाहने देखील मोठ्या प्रमाणात आहेत परंतु रस्ता छोटा असल्याने त्याठिकाणी विविध अडचणी येत आहेत.तालुक्याचा दक्षिण भाग पूर्णपणे या रस्त्यावरती अवलंबून आहे. शिवाय रेल्वे स्टेशनला जोडणारा हा रस्ता असल्याने भाविक तसेच या भागातील सर्व गावची वाहने हे या रस्त्याचा वापर
करतात.अक्कलकोट ते तुळजापूर ,अक्कलकोट ते सोलापूर, अक्कलकोट ते गाणगापूर, अक्कलकोट ते दुधनी यासारखे सर्व रस्ते हे आता काँक्रीट झालेले आहेत.यात विजयपूर ते लातूर या नवीन महामार्गालाही मंजुरी मिळाली आहे. परंतु हा रस्ताही तितकाच महत्वाचा आहे.अक्कलकोट ते स्टेशन रस्ता एकमेव डांबरीकरण आहे.एकावेळी दोन वाहने पास होत असताना अडचणी येत आहेत.हा रस्ता जर चौपदरी झाला तर रेल्वे स्टेशनकडे जाणारी रहदारी वाढणार आहे.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे परंतु या स्टेशनला अनेक रेल्वे थांबतच नाहीत.त्यासाठी जाणीवपूर्वक कोणी प्रयत्न केलेले नाहीत.जर ते केले असते तर ते होऊ शकले असते.जर या ठिकाणी लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या थांबल्या तर सोलापूरसारखे मोठे जंक्शन या ठिकाणी निर्माण होऊ शकते त्यासाठी प्रयत्न कमी पडताना दिसत आहेत.रस्ता मोठा नसल्याने आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने अक्कलकोटला बाय कार येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.ती थांबू शकते.जर थेट रेल्वेने या ठिकाणी येता येत असेल तर या ठिकाणी स्टेशनवर गर्दी वाढू शकते.याचा परिणाम म्हणून स्टेशन परिसर असेल किंवा अक्कलकोट शहराचे जे आर्थिक उलाढाल आहे त्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो.याचा विचार करून हा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा,अशी मागणी भाविकातून होऊ लागली आहे.
शिवपुरीला चांगल्या कनेक्टिव्हिटीची गरज
अक्कलकोट पासून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर जागतिक कीर्तीचे शिवपुरी केंद्र आहे.अग्निहोत्राचे मूळ उगम स्थान आहे.या ठिकाणी परदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येतात.या ठिकाणची कनेक्टिव्हिटी नीट नसल्यामुळे मागच्या काही वर्षांपासून परदेशी भाविकांची संख्या रोडावली आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी जर वाढली तर हा परिसर देखील सुधारणार आहे.
नव्या बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नामुळे अक्कलकोटच्या नवीन बस स्थानकाला २९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या माध्यमातून त्याचे काम ही प्रगतीपथावर आहे. दोन वर्षात नवीन बस स्थानक शहराला मिळेल. नवीन इमारतीमुळे शहराच्या वैभवात तर भर पडेलच पण या सुंदर आणि आकर्षक अशा बसस्थानकामुळे भाविकांची सोय देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे. या बस स्थानकाबरोबरच रेल्वे कडेही आता लक्ष देण्याची गरज आहे.
स्वामी समर्थांमुळे सकारात्मक दृष्टिकोन
सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे अशामध्ये अनेक योजना पूर्णत्वास जात आहेत.अक्कलकोटसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणि स्टेशनचा चौपदरी रस्ता या दोन बाबी खूप महत्त्वाच्या असून त्या जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरबारी मोठ्या ताकदीने लावून धरल्या तर भविष्यकाळात अक्कलकोटचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही.विशेष म्हणजे वरच्या मंडळींचा देखील स्वामी समर्थांमुळे अक्कलकोटकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे.त्याचा फायदा अक्कलकोटला होऊ शकतो.
कमी वेळेत दर्शनाची सुविधा महत्त्वाची
एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे.ती रस्त्याची असेल ,रेल्वेची असेल किंवा विमानाची असेल त्याशिवाय बाहेरचा माणूस कमी वेळेत आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. आता श्री स्वामी समर्थ मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.त्यामुळे लोकांना अगदी कमी वेळेत अक्कलकोटला पोहोचून दर्शन घेऊन पुन्हा माघारी पोहोचण्यासाठी अशा सर्व प्रकारच्या सुविधांची गरज आहे, अशी चर्चा नेहमी भाविकांमध्ये होऊ लागली आहे.