अहमदाबाद प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली पाच सामन्यांची टी-२० मालिका सध्या २–१ अशी बरोबरीत आहे. चौथा सामना धुक्यांमुळे रद्द झाल्याने पाचवा आणि अंतिम सामना मालिकेचा फैसला करणारा ठरला आहे. हा निर्णायक सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात असून सामन्याला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात झाली आहे.
नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला असून कर्णधार एडन मार्रक्रमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टॉस हरूनही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव समाधानी दिसला. टॉसनंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, टॉस जिंकलो असतो तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती. त्यामुळे भारतीय संघ २० षटकांत किती धावा उभारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेने केवळ एक बदल केला असून, भारताने तीन बदल केले आहेत. उपकर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे या सामन्याला मुकला असून त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संजू तब्बल एका वर्षानंतर सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आहे.
तसेच, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघात पुनरागमन केले असून त्याच्या जागी हर्षित राणाला वगळण्यात आले आहे. चौथ्या सामन्यात वैयक्तिक कारणामुळे बाहेर असलेला बुमराह पुन्हा संघात दाखल झाला आहे. फिरकी विभागातही बदल करण्यात आला असून कुलदीप यादवच्या जागी ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
आता या निर्णायक सामन्यात भारत की दक्षिण आफ्रिका, कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष केंद्रित झाले आहे.