ध्यास विश्वसार्ह बातमीचा

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; शुबमन गिलकडे नेतृत्व

मुंबई वृत्तसंस्था : टीम इंडियासाठी 2026 वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेने होणार असून, या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीने कर्णधार बदल केला आहे. शुबमन गिलकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं असून, श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी पुनरागमन झालं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतीमुळे बाहेर असलेला शुबमन गिल पुन्हा संघात परतला आहे. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झालेला श्रेयस अय्यरही न्यूझीलंड मालिकेतून कमबॅक करत आहे. मात्र श्रेयस या मालिकेत खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलने नेतृत्व केलं होतं, पण शुबमन परतल्यामुळे कर्णधारपदाची धुरा पुन्हा त्याच्याकडे आली आहे.

या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी यांचंही एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे. मात्र अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा संधी नाकारण्यात आली आहे. शमीची निवड होईल, अशी चर्चा असतानाच त्याला डच्चू देण्यात आल्याने त्याच्या पुनरागमनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. पहिला सामना 11 जानेवारीला बडोदा येथे, दुसरा सामना 14 जानेवारीला राजकोट येथे, तर तिसरा आणि अंतिम सामना 18 जानेवारीला इंदूर येथे खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे अनुभवी खेळाडूही आहेत. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधत बीसीसीआयने नव्या वर्षातील पहिल्याच मालिकेसाठी मजबूत संघ उभा केला आहे. आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!