नवी दिल्ली वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया क्रिकेट टीमने एकदिवसीय मालिका गमावली आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 11 डिसेंबरला होणार आहे. टीम इंडियासमोर हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया पाहुण्या टीम इंडियाला पराभूत करण्यासह 3-0 ने क्लिन स्वीप करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वूमन्स टीम इंडिया या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात टी 20i मालिका खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात या टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी पाहुण्या संघाने काही दिवसांपूर्वीच संघ जाहीर केला आहे. मात्र मालिकेला अवघे काही तास शिल्लक असूनही भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवड समिती या मालिकेसाठी भारतीय संघाची केव्हा घोषणा करते? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.
3 सामने 1 मैदान
मालिकेतील तिन्ही सामने हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पर्यायाने दोन्ही संघांना सरावासाठी अधिक वेळ देता येणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 15 डिसेंबरला होणार आहे.
टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 15 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
दुसरा सामना, 17 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
तिसरा सामना, 19 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
टी 20i सीरिजसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उप-कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, रशादा विल्यम्स, चिनेल हेन्री, झैदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार आणि करिश्मा रामहरक .