ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्याला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कथित हेरगिरी करणाऱ्या रशियाची राजधानी मॉस्कोस्थित भारतीय दूतावासातील एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सतेंद्र सिवाल अशी कर्मचाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. संरक्षण, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य ठिकाणांशी संबंधित गोपनीय माहिती पाकला पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांसोबत काम केले जात असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

इलेक्ट्रॉनिक व प्रत्यक्ष पाळत ठेवत करण्यात आलेल्या तपासात सतेंद्र सिवाल हा आयएसआय संचालकाच्या नेटवर्कसोबत भारतविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे आढळले. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य ठिकाणाच्या धोरणात्मक कारवाया व अन्य महत्त्वपूर्ण माहिती तो पाकला पुरवत होता. पैशाच्या मोबदल्यात देशाची संवेदनशील माहिती पाकला पाठवण्याचे काम तो करत होता.

हेरगिरी करणाऱ्या सतेंद्र सिवाल याला चौकशीनंतर अटक करण्यात आल्याची माहिती यूपी पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी रविवारी दिली. हापूड जिल्ह्यातील शाह महिउद्दीनपूरमधील रहिवासी सतेंद्र सिवाल हा परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असून, सद्यस्थितीत तो मॉस्कोस्थित भारतीय दूतावासामध्ये तैनात आहे. भारतीय कर्मचाऱ्याच्या माध्यमातून पाककडून हेरगिरी केली जात असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!