मुंबई प्रतिनिधी : टी-२० विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून शनिवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात ही घोषणा करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत संघ जाहीर केला. या निवडीत काही धक्कादायक बदल पाहायला मिळाले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली आहे, तर शुभमन गिलला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
या संघात संजू सॅमसनला पुन्हा संधी देण्यात आली असून ईशान किशन आणि रिंकू सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. हा संघ विश्वचषकापूर्वी 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतही खेळणार आहे. या मालिकेद्वारे संघाला विश्वचषकासाठी तयारीची संधी मिळणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि ईशान किशन.
भारत आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध करणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला दिल्लीत नामिबियाविरुद्ध, 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि 18 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध सामने खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेत भारताला तुलनेने सोपा गट मिळाला असून गट ‘अ’ मध्ये पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्ध भारताचा अलीकडील रेकॉर्डही भक्कम राहिला असून आशिया कप आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने वारंवार वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.