प्राचीन इतिहास समोर ठेवल्यास भारताचे भवितव्य उज्वल !
विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला उत्साहात प्रारंभ
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
कालचा भारत अद्वितीय होता.आज तो संभ्रमावस्थेत आहे . जर व्यवस्थेने कालच्या भारताचे अनुकरण केले तर उद्याचा भारत नक्कीच उज्वल होईल, असा आशावाद छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केला. सोमवारी, येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे आयोजित व्याख्यानमालेला आमदार सचिन कल्याणशेट्टी व गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
त्यावेळी पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.भारत – काल, आज आणि उद्या हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अडीच तासाच्या या व्याख्यानातून त्यांनी भारतीय संस्कृतीची विविध अंगाने वैशिष्ट्ये सांगितली.भारतीय इतिहास हा हजारो वर्षांपासून आपल्यात आहे परंतु आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही.इतर देशांमध्ये मात्र याचे अनुकरण केले जाते ही बाब खंत व्यक्त करणारी आहे. आज अमेरिका व इतर राष्ट्रांचा इतिहास नऊशे किंवा फार झाले तर दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे पण भारताचा इतिहास हा पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा आहे.अतिशय प्राचीन संस्कृती ही फक्त जगात आपल्याकडे आहे आणि ती सर्वश्रेष्ठ आहे.आज संपूर्ण जगाकडे पाहिले तर संस्काराचे देवघर म्हणून भारताकडे पाहिले जाते.आज कैलास लेणे हे भारताचे वैभव आहे. डोंगर पोखरून त्याची निर्मिती केली गेली.आज बँकॉक, पटाया सारख्या देशांमध्ये समुद्रमंथनाचा स्टॅचू उभारला जातो आणि त्या स्टॅच्यू वरती भारतीय संस्कृतीचा उल्लेख होतो हे आपल्या भारतीयांना कधी कळणार आहे.
माणसाचा आहार कसा असावा हे भगवद्गीते मध्ये फार पूर्वी लिहिले आहे त्या काळामध्ये मसाल्याची निर्यात भारतामध्ये होत होती. इतिहासाचा आपण अभ्यास केला तर सोमनाथ मंदिरावर सतरा वेळा आक्रमण झाली तरीही हा पुरावा जिवंत आहे.त्या मंदिरावररून पृथ्वीचा व्यास कळतो. त्या काळात आर्यभट्टाने व्यास कसा मोजला असेल.नंतर ती ब्रिटिशांनी मोजून खात्री केली ती तंतोतंत जुळली म्हणून रामायणात वाल्मिकीने केलेले वर्णन हे लोकांना आश्चर्य वाटत असले तरी पण ही वस्तुस्थिती आहे आणि ती खरी गोष्ट आहे.शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक वर्णन रामायणामध्ये केले गेले आहे. खरे तर सगळ्यात पहिल्यांदा श्रीरामाने परराष्ट्रावरती आक्रमण केले हे भारताचे श्रेष्ठत्व आहे, असेही ते म्हणाले.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.शब्बीर हुज्जु यांनी करून दिला.त्यानंतर श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर मेलगिरेप्पा तेली,धुळप्पा बजे,मोहन चव्हाण,धर्मराज गोविंदे,राचप्पा वागदरे,परमेश्वर जकापुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूजी निंबाळकर यांनी केले तर खंडेराव घाटगे यांनी मानले.यावेळी ज्येष्ठ नेते मल्लिनाथ कल्याणशेट्टी ,अशोक येणेगुरे,विलास कोरे, बाळा शिंदे,मल्लिकार्जुन मसुती,शिवशरण जोजन,महेश कापसे,भीमराव साठे,महेश कोटनूर,सुनील गोरे,महेश कलशेट्टी आदींस विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्लास्टिक सर्जरीचा शोध सतराव्या शतकात
खरे तर आयुर्वेदामध्ये १७ व्या शतकात प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला याचे श्रेय आज आपण या आधुनिक युगातील संशोधनाला देतो.इतिहास कधीतरी डोकावून पाहिला पाहिजे तरच या गोष्टींचे उत्तर हे आपल्याला मिळेल आणि हा इतिहास आजच्या पिढीला शिकवण्याची गरज आहे तरच उद्याचा भारत उज्वल दिसेल असे सांगून बावस्कर यांनी इतिहासातील अनेक पुरावे देत उपस्थितांना उद्याचा भारत कसा असेल याचाही वेध घेतला.