ध्यास विश्वसार्ह बातमीचा

युवा शक्तीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल! सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास थाटात प्रारंभ

सोलापूर, दि.9- युवा शक्ती ही अशक्याला शक्य करणारी मोठी ताकद आहे. युवाशक्तीच्या बळावरच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज या युवा शक्तीमुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

रविवारी, मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, यजमान महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. सुजित कदम, प्र कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, मीनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शनी कदम-महाडिक, पवन महाडिक, तेजस्विनी कदम, प्रा. शोभाताई काळुंगे आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविकात युवा महोत्सवात होणाऱ्या कलाप्रकारांची माहिती सादर करीत महोत्सव आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला.

आमदार आवताडे बोलताना म्हणाले की, युवा शक्ती म्हणजे अशक्य असे काही नाही, असा आजचा युवक असून येणाऱ्या काळात अनेक आव्हाने पेलून यश संपादन करण्याची जिद्द आजच्या पिढीला आहे. विद्यापीठाने युवा महोत्सव आयोजन करण्याची संधी दुसऱ्यांदा मंगळवेढेकरांना दिली. युवा विद्यार्थ्यांनी आपले कलागुण प्रदर्शित करत आनंद साजरा करावा. जे चांगले आहे, ते स्वीकारावे आणि जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, चांगल्या पद्धतीचा सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व तयार होण्यासाठी विद्यापीठातर्फे युवा महोत्सव आयोजिला जातो. यामध्ये भारतीय ज्ञान, विज्ञान बरोबरच संस्कृती जपण्यासाठी तब्बल 29 कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे, त्याचा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना निश्चित फायदा पुढील शिक्षणासाठी होणार आहे. अकॅडमिक बँक क्रेडिटची पध्दत आणल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने युवा महोत्सवात भाग घेऊन स्वतः ला घडवावे. विद्यापीठात ललित कला संकुल सुरू करून नृत्य, नाट्य, संगीत, ललित विभाग सुरू केले. त्यात परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शिक्षण घेत आहेत. जेणे करून कलेशी वारंवार जोडून राहून सराव केल्यास त्याचा करियरला फायदा होतो, असे ही कुलगुरू डॉ फडणवीस म्हणाल्या.

पोलीस अधीक्षक सातपुते म्हणाल्या की, मंगळवेढ्यात युवा महोत्सव होण्यासाठी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. निश्चितच याचा भविष्यात त्यांना फायदा होणार आहे. युवा महोत्सव संपल्यावर तितक्याच उत्साहाने अभ्यास करता येईल व यश संपादन करता येईल, असे त्या म्हणाल्या.

प्रशांत परिचारक म्हणाले की, विद्यार्थ्यांना युवा महोत्सवाच्या निमित्ताने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. युवा महोत्सव घेण्यासाठी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाने पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे. दलित मित्र कदम गुरुजी यांच्या विचारांचा वारसा ऍड. सुजित कदम हे पुढे घेऊन जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आनंदाचे दिवस म्हणजे युवा महोत्सव. आपल्या कला सर्वांपुढे सादर करण्याची संधी यामुळे मिळते, असे ही ते म्हणाले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार ऍड. सुजित कदम यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!