सोलापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नुकतेच शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट राहा, नाहीतर धावपळ होईल”, असं सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
“मी जे बोलले त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे. 2014 पासून युती होणे, निवडणुका आणि अनेक लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, या वस्तुस्थितीकडे पाहिले तर एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते. अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण, विज बिल माफी, पेसा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेत आहेत. मराठा, धनगर आरक्षणाबाबत योग्य निर्णय होईल. कोणावर अन्याय होणार नाही याची खात्री आहे”, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली.
“मी म्हणाले की, दर तीन-चार दिवसांनी महाराष्ट्राचा राजकारण बदलतंय. निवडणुका जाहीर होऊन फॉर्म भरेपर्यंत असे बदल नेहमीच होत असतात. अत्यंत परिपक्व पद्धतीने या बदलांकडे पाहणं ही कार्यकर्त्यांची मानसिकता असली पाहिजे. अनेकदा कार्यकर्त्यांचा तात्कालीक दबाव, भावना याचा अतिरेक होतो. जे नवीन कार्यकर्ते, ज्यांनी निवडणुका पाहिल्या नाहीत त्यांच्यासाठी ते विधान केले. पुढील तीन दिवसांनी आपण परत बोलूया”, असं सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं.