मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. काल मध्यरात्री अनंत अंबानींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाणं आलं आहे. या भेटीचा तपशील अजून बाहेर आलेला नाही. परंतु वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची अंबानींशी झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीदरम्यान, शिंदे-अंबानी यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आगामी प्रकल्पांबाबत राज्य सरकारचं सहकार्य मिळावं, यासाठी ही भेट झालेली असू शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तवले आहेत.
काही आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा भेटदेखील झाली होती. उद्योगपतींसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. दरम्यान, अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी झालेल्या चर्चा गुलदस्त्यात आहे. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यात भेट झाली होती. वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरवला गेला असल्याची टीका केली जात होती. यानंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडीत अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे भेट ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.