नाशिक : वृत्तसंस्था
ज्याप्रमाणे इंग्रजकालीन कालबाह्य कायदे हद्दपार करून भारत सरकारने देशाच्या कायदा व सुव्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडविले, त्याच पद्धतीने राज्याच्या गृह विभागाने गुन्ह्यांच्या वेगवान तपासासाठी ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आता महाराष्ट्राच्या या मॉडेलची अंमलबजावणी देशाच्या इतर राज्यांमध्ये देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस पुढे म्हणाले की, डायनॅमिक प्लॅटफॉर्मद्वारे गुन्ह्याशी संबंधित सर्व विभाग व गरज पडल्यास दोन राज्यांमध्येही संवाद घडवून गुन्हे तपासास बळ दिले जाते. सद्यस्थितीत पोलिस खात्यासमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत. ‘स्ट्रीट क्राइम’च्या तुलनेत ‘व्हाइट कॉलर क्राइम’ झपाट्याने वाढतो आहे. ड्रग्ज माफिया, महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होते आहे. सोशल मीडियाच्या गैरवापरातून लोकांची माथी भडकविली जातात. या सर्व गुन्ह्यांमध्ये महिलांच्या विरोधातील गुन्ह्याशी कुठल्याही स्थितीत तडजोड होता कामा नये, याची पोलिसांनी दक्षता घ्यावी. समाजानेही विकृतांवर नजर ठेवताना आपली मुले ड्रग्जसारख्या व्यसनांना बळी पडणार नाहीत व समाजातील प्रत्येक महिलेचा सन्मान करण्यास ते शिकतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर तक्रारीस प्रतिसाद वेगवान हवा, या मुद्द्यावर राज्याच्या गृह विभागाने लक्ष केंद्रीत केले. महिलांशी संबंधित गुन्हेही अत्यंत संवेदनशीलपणे पोलिसांनी हाताळले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे नियंत्रणासाठी समन्वय समित्याही स्थापन केल्या आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फॉरेन्सिक व्हॅन सुरू
गुन्हा घडल्यानंतर फॉरेन्सिक तज्ज्ञ त्यांच्या साधनांसह वेळेत पोहोचणे हे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गरजेचे असते. अनेक प्रकारच्या मर्यादांमुळे प्रत्येक गुन्ह्यात हे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलिस दलात दोन फॉरेन्सिक व्हॅनद्वारे काम सुरू करण्यात आले आहे. या व्हॅन घटनास्थळी त्वरित पोहोचून गुन्ह्याच्या फॉरेन्सिक तपासासाठी पोलिसांना मदत करतात, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.