नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्रायल-हमास युद्धामुळे बांधकाम क्षेत्रासह विविध क्षेत्रात निर्माण झालेल्या मजुरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी इस्रायलकडून भारतातून मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती केली जाणार आहे. यासाठी इस्रायलच्या एका पथकाने गत आठवड्यात भारताला भेट दिली होती. तर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणखी एक इस्रायली शिष्टमंडळ पुढच्या आठवड्यात भारतात येणार आहे.
भारतीय कामगारांच्या भरतीची प्रक्रिया २७ डिसेंबरपासून दिल्ली आणि चेन्नईमध्ये केली जाणार आहे. सद्यःस्थितीत सरकारच्या परवानगीनुसार १० हजार कामगारांची भरती केली जाईल. नजीकच्या भविष्यात हा आकडा ३० हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती इस्रायल बिल्डर्स असोसिएशनचे उपमहासंचालक आणि प्रवक्ते शे पॉझरन यांनी दिली.
प्रामुख्याने बांधकाम क्षेत्रासाठी इस्रायलकडून कामगारांची भरती केली जात आहे. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणारी भरती प्रक्रिया १० ते १५ दिवस चालणार असल्याचे ते म्हणाले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारतातून आणखी कामगार पाठवले जाण्याची गरज व्यक्त केली होती. सद्यःस्थितीत जवळपास १८ हजार भारतीय इस्रायलमध्ये काम करत आहेत.