मुंबई दि. १४ ऑक्टोबर – कोर्टाच्या ऑर्डरनुसार एनसीबीने गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे एनसीबीने समीर खान व इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान एनसीबीसारख्या केंद्रीय यंत्रणेला गांजा आणि टोबॅको यातला फरक कळू नये ही बाब फार गंभीर असल्याचेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या काही दिवसापासून पत्रकार परिषद घेऊन एनसीबी या केंद्रीय यंत्रणेच्या गैरकारभाराचे वाभाडे काढत आहेत. आजही त्यांनी पत्रकार परिषद घेत १३ जानेवारी रोजी त्यांचे जावई समीर खान यांची जी अटक झाली होती, त्याबाबत सत्यपरिस्थिती माध्यमांसमोर मांडली.
याआधी नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी त्यांच्या जावयावरही एनसीबीने कारवाई केली असल्याचे प्रश्न विचारले गेले होते. त्यावर आज नवाब मलिक यांनी सविस्तर भूमिका मांडली.
२७ सप्टेंबरला एनडीपीएसच्या विशेष कोर्टाने समीर खान, करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना साडे आठ महिन्यानंतर जामीन दिला. यावेळी कोर्टाची लेखी ऑर्डर काल( बुधवारी) प्राप्त झाली आहे. जस्टीस जोगळेकर यांनी ही ऑर्डर जाहीर केली. या ऑर्डरनंतरचा सगळा घटनाक्रम नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडला.
१४ जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यावर दाखवले गेले की, मोठ्याप्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी फर्जीवाडा करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना फ्रेम केले गेले. रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही असेच झाले असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
माझ्या जावयाला फ्रेम केल्यानंतर गेले अनेक महिने आम्ही तणावात होतो. मात्र आमचे नेते शरद पवारसाहेबांनी माझे धैर्य वाढवले. जावयाने काही चूक केली असेल तर त्याची शिक्षा कायदा त्याला देईल, मात्र त्याची शिक्षा सासऱ्यांना देता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीने पत्रकारांना सांगितले की, दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोतून ट्रेस केले गेले. ९ जानेवारी करण सजनानी जे वांद्रे येथे राहतात, त्यांच्या घरी छापा टाकला गेला. एनसीबीने अधिकृत प्रेस नोट काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची बातमी दिली. त्याच दिवशी ९ जानेवारी रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्याने आपल्या मोबाईल नंबरवरुन प्रेस नोट आणि चार फोटो पाठवले. एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली असल्याचे या प्रेस नोटद्वारे सांगितले. ९ जानेवारी रोजी राहिला फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे साडे सात ग्रॅम गांजा जप्त केला गेला. त्या मुलीला त्याच दिवशी जामीन मिळाला. याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. १२ जानेवारी रोजी रात्री १० वाजता माझे जावई समीर खान यांना समन्स पाठविण्यात आले. १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता माझे जावई समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. तिथे आधीपासूनच वृत्तवाहिन्याचे कॅमेर लागलेले होते. सर्व वृत्तवाहिन्यावर माझ्या जावयाचा फोटो लावून ते अंमली पदार्थाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले. अटक झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत एनसीबीने तीन महिने वेळ घालवला. दिनांक ९ जानेवारी रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईची प्रेस नोट आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे फोटो एनसीबीचे अधिकारी यांच्या XXXXXXXXXX या मोबाईल नंबरवरुन पत्रकारांना फॉरवर्ड करण्यात आले होते. या फोटो आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर मिडियाने बातम्या दिल्या. शेवटी कुणीही कितीही बातमी पेरली तरी त्याची खातरजमा पत्रकारांनी केली पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी माध्यमांना केले.