ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या महिन्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज अखेर जामीन मंजूर करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला हा दिलासा दिला आहे.

प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यात त्याने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्याला महिन्याभरापूर्वी तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने तो जामिनासाठी प्रयत्नशील होता. या प्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला.

कोर्टाने यापूर्वी त्याला प्रथम 3, तर नंतर 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. तेव्हाच त्याला जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानंतर आज अखेर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला.

उल्लेखनीय बाब म्हणजे इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी गत सोमवारीच प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कारागृहाच्या पत्त्यावरच अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती. कोरटकरने आपल्या जामीन अर्जात इंद्रजित सावंत यांच्यावरच शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सरोदे यांनी त्याला अब्रुनुकसानीची नोटीस बजावली होती.

असीम सरोदे आपल्या नोटीसीत म्हणाले होते की, माझे अशील (इंद्रजित सावंत) हे कायद्याचे पालन करणारे व्यक्ती आहेत. ते इतिहास संशोधक आहेत. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा विशेष अभ्यास केला आहे. ते आपल्या अभ्यासाचे तथ्यात्मक पैलू अतिशय सभ्य पद्धतीने मांडण्यासाठी ओळखले जातात. पण विविध न्यायालयांत तुम्ही चुकीचे व मानहानीकारक दावे लिखित स्वरुपात दाखल माझ्या अशिलाची गंभीर मानहाणी केली. अशा प्रकारच्या परिच्छेदात तुम्ही इंद्रजित सावंत यांना एक वाईट व्यक्ती म्हणून चित्रित केले. यामु्ळे त्यांच्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठेला जबर धक्का बसला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!