जालना : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे, नंतर त्यांना बोलता येणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजावर सरकारकडून प्रचंड अन्याय केला जात आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहेत. देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गावबंदी केली आहे आमच्यावर. आमचा रस्ता बंद केला, रस्ता यांच्या बापाचा आहे का? शासनाचा रस्ता आहे. हेच जर आम्ही त्यांना केले असते तर भुजबळांनी थयथयाट केला असता. गरिबांवर अन्याय सुरू केला आहे, असे भुजबळ म्हणत बसले असते. पूर्वी जसा एका विशिष्ट समाजावर अन्याय केला जायचा तसा आता मराठा समाजावर अन्याय केला जात आहे. मराठ्यांना वाळीत टाकले आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले असून आज त्यांचा सहावा दिवस आहे. राज्यातील मराठा समाजाकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. यासोबतच पुण्यातही बंदची हाक देण्यात आली आहे.
एकीकडे मराठा समाज पेटलेला असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी जालन्याच्या वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे देखील आमरण उपोषण सुरू झाले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सकाळी जालन्याचा वैद्यकीय पथक त्यांची तपासणी केली दोघांचाही बीपी सध्या तरी स्टेबल आहे. मात्र दोघांनीही आता उपचार घेण्याची गरज असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आरोग्य प्रशासनाकडून तशी उपचार घेण्यासाठी विनवणी देखील करण्यात आली आहे.