छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सततच्या धावपळीमुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आहे. काही दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात संवाद मेळावे घेत आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता आणि त्यात सातत्याने प्रवास करून मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन ते त्यांच्याशी संवाद साधत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे-पाटील हे छत्रपती संभाजीनगरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. त्यानंतर काही ठिकाणी समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन ते आपल्या मूळगाव अंतरवाली सराटी येथे परतले होते. त्यानंतर त्यांनी नारायण गड या ठिकाणी नियोजित ८ जूनला होणाऱ्या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. दरम्यान पाण्याची टंचाई आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी ८ जूनला होणारी सभा ही पुढे ढकलण्याचे संयोजकांना कळविले होते. त्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावी परतले होते. शुक्रवारी दुपारी मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मनोज जरांगे-पाटील यांना अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. दरम्यान त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असून, रक्तदाब कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिला आहे.