मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या वर्षापासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न जोर धरत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी आपल्या विविध मागण्यांसाठी भाऊसाहेब जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील सादर केले.
भाऊसाहेब जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांसंदर्भात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी या निवेदनात दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी त्यांनी हे निवेदन दिले असून यामध्ये जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी भाऊसाहेब जरांगे पाटील यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत. तर त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब जरांगे हे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढे आले आहेत. शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारला घेरणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मराठा समाजाच्या आंदोलनाकडे वेळवला. तर भाऊसाहेब जरांगे हे शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा देत आहेत.