ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचा इशारा : तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का?

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले असून आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा नवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचा अक्षरश: ढीग लागला आहे. जवळपास 700 ते 800 अर्ज त्यांच्याकडे जमा झाले असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. यात गोरगरीब तसेच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

मनोज जरांगे यांच्याकडे अनेक प्रस्थापितांचे तसेच राजकीय ताकद असलेल्या उमेदवारांचे देखील अर्ज आले आहेत. मात्र अशा लोकांना मनोज जरांगेंनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का? अशा शब्दात त्यांनी प्रस्थापितांना सुनावले आहे. दरम्यान, आता अंतरवालीसराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळत आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी चार वेळा निवडून आलो, मी पाच वेळा निवडून आलो म्हणून मला उमेदवारी द्या, हे आता चालणार नाही. आम्हाला आमच्या समाजातील गरीब पोरांचे भलं करायचे आहे. कोणी म्हणतो मी याला नोकरी लावली, त्याला शाळेवर लावले, पण या सगळ्यांना सांगायचे आहे की, तुम्ही समाजावर उपकार केलेले नाहीत. तो कष्ट करतो म्हणून तुम्ही त्याला कामावर लावले आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता मनोज जरांगे यांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. लढायचे की पाडायचे? यावर येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णय घेण्यात येणार होता, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!