जालना : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या पाच महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा सरकार विरोधात लढा सुरु होता. या लढ्याला राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर शनिवारी २७ जानेवारी नवी मुंबईतून मराठा आंदोलक माघारी परतले. मनोज जरांगे पाटील देखील मध्यरात्रीच्या सुमारास जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पोहचले. मुंबईतून मराठा आरक्षण घेऊनच परतल्यानंतर गावातील मराठा बांधवांनी जरांगेचं जंगी स्वागत केलं.
यावेळी डीजेवर मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच गुलाल उधळून पेढे देखील वाटण्यात आले. मध्यरात्रीपर्यंत अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मराठा समाजाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला तब्बल १२३ गावातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील या बैठकीत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.