बीड वृत्तसंस्था : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रियांचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मिरवट येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईसह राज्यात भाजपला मिळालेल्या यशावर भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्या पुण्यात अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि बससेवेची घोषणा केली होती, त्या पुण्यात त्यांना केवळ 27 जागा जिंकता आल्या. मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा अजित पवारांना मोठे अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजित पवारांच्या पराभवामागची कारणे सांगताना जरांगे पाटील यांनी भाजपलाही सूचक इशारा दिला. भाजपवाले कलाकार आहेत, त्यांनी सगळ्यांचा काटा काढला. आधी महाविकास आघाडी संपवली, आता शिंदे आणि अजित दादांचाही काटा काढला, असा आरोप त्यांनी केला. अजित पवारांनी नासके आणि पापी लोक सोबत ठेवल्यामुळे मराठा समाजाचं मतदान त्यांना मिळालं नाही, असा दावा त्यांनी केला.
अजित दादांनी रक्ताने माखलेले लोक जवळ ठेवले, त्यामुळे लोक लांब गेले. दोन नासके लोक सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला आणि त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत बसला, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.
पुढील राजकीय चित्रावर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले की, सन 2029 च्या निवडणुकीत जर मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले तर भाजपाला चिरडतील. अजित पवारांनी या पराभवातून धडा घ्यावा आणि चुकीच्या लोकांपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.